
पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर अजिंठ्याकडून पहूरकडे येणारी एक पिकअप गाडी वाघूर नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाजवळ सुमारे १५ फूट खोल कोसळली. मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पहूर येथील वाघूर नदीवरच्या पुलाजवळ असलेल्या शनि मंदिरापाशी अजिंठ्याकडून पहूरकडे भरधाव वेगात आलेली पिकअप (एम पी ४६ जी २९०७) अचानक १५ फूट खोल कोसळली. या अपघातात सयाजी शिवाजी भिल (वय ३६) आणि राकेश सियाम सिंग बारेला (वय १९), दोन्ही रा. वासरवाडी (ता. शिरपूर), हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी दोघांनाही जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. दरम्यान, या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या संथगतीने सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पुलाच्या परिसरात यापूर्वीही झालेल्या अपघातांमध्ये तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. “अजून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किती जणांचा बळी घेणार आहे?” असा संतप्त सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. या मार्गावरील अपूर्ण कामांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.



