Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात ‘फिजिओफेस्ट २०२६’ जल्लोषात 

डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात ‘फिजिओफेस्ट २०२६’ जल्लोषात 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी मध्ये ‘रेट्रो थीम’वर आधारित ‘फिजिओफेस्ट २०२६’ हा वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. विद्यार्थ्यांनी जुन्या सुवर्णयुगातील कलाविष्कार रंगमंचावर साकारत उपस्थितांना भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमवले.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. उल्हास पाटील (अध्यक्ष, गोदावरी फाउंडेशन) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, सीईओ डॉ. विजय बाविस्कर, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता वैद्य हर्षल बोरोले, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावर्षीच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेली ‘रेट्रो थीम’ विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने साकारली. जुन्या काळातील दिग्गज अभिनेते व अभिनेत्रींच्या भूमिका हुबेहूब उभ्या करत गीत, नृत्य आणि प्रभावी अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे तसेच कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. त्यांनी विशेषतः डॉ. मनोज सुर्यवंशी, डॉ. कृतिका काळे आणि विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांशी संवाद साधत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी केवळ सांस्कृतिक नव्हे तर संघटनात्मक कौशल्याचेही उत्कृष्ट दर्शन घडविल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. श्रृती, फाल्गुनी सातव, आदित्य अग्रवाल, डॉ. मेहवीश, सुमेधा यश आणि पवन कलश यांनी केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी परिषदेचे सदस्य ओम चौधरी, दिशाली वैराळकर, चंदन मौर्य, सुशांत शिसोदे, मृणाल सावळे, राधिका अरबट, अश्विनी नाईक, सनी इंगळे, अथर्व बोडद, कल्पेश निकुंभ, कुलदीप इंगळे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांनी सर्वांचे आभार मानले.


Protected Content

Play sound