मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात निर्णायक भूमिका बजावणारे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे शनिवारी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. अणुऊर्जा विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
डॉ. राजगोपाल चिदंबरम यांनी १९७४ मध्ये भारताच्या पोखरणमधील पहिल्या आणि १९९८ मध्ये दुसऱ्या अण्वस्त्र चाचणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून अनेक प्रतिष्ठित पदांवर काम केले आहे.
१९३६ मध्ये जन्मलेले डॉ. चिदंबरम चेन्नईतील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरूचे माजी विद्यार्थी होते. डॉ. चिदंबरम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल १९७५ मध्ये पद्मश्री आणि १९९९ मध्ये पद्मविभूषण, तसेच अनेक विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेटसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. चिदंबरम यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार (२००१-२०१८), भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक (१९९०-१९९३), अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष (१९९३-२०००) अशा अनेक प्रतिष्ठित पदांवर काम केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष (१९९४-१९९५) म्हणूनही काम केले आहे.