भुसावळ प्रतिनिधी । जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार येथे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज सकाळपासून एक दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे.
भुसावळ शहरात मंगळवार आणि शनिवार असे आठवड्यातून दोन दिवस जनता कर्फ्यू म्हणून पालन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज सकाळपासून जनता कर्फ्यूला प्रारंभ झाला आहे. यात अगदी जीवनावश्यक श्रेणीतील भाजीपाला विक्री व किराणा दुकाने देखील बंद राहतील. तर दुधाची विक्री सकाळी ७ ते १० व दुपारी ४ ते सायंकाळी ७ या काळातच केली जाईल. हॉस्पिटल, मेडिकलची सेवा आधीप्रमाणेच २४ तास सुरू राहणार आहे.
शहरातील जनतेचे स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यात नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. शहरात जनता कर्फ्यूच्या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करावे लागेल. अनावश्यक घराबाहेर पडू नये, कामावर जाणार्यांनी तोंडावर मास्क लावणे, ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील. शहरातील व्यापारी-विक्रेत्यांनी दुकाने उघडू नयेत. दुकाने उघडी आढळल्यास कारवाई होणार आहे. तसेच विनाकारण घराबाहेर पडणार्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.