
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।आगामी २ डिसेंबर रोजी होणाऱ्या यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या प्रचाराला शहरातील विविध भागातून सर्व जातीधर्माच्या नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

या प्रचार अभियानात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार छायाताई पाटील आणि माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व पॅनल उमेदवारांच्या प्रचारात युवा नेते धनंजय शिरीष चौधरी यांनीही सक्रिय सहभाग घेतला आहे.
दरम्यान, शहरातील बोरावल गेट परिसरात महाविकास आघाडीच्या वतीने एक आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला. या भागातील संविधान दिनी (२६ नोव्हेंबर) जन्मलेल्या एका बालिकेचा वाढदिवस माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, उमेदवार छायाताई पाटील आणि युवा नेते धनंजय शिरीष चौधरी यांच्या हस्ते उत्साहात साजरा करण्यात आला. या कृतीतून महाविकास आघाडीने सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांचा आदर जपण्याचा संदेश दिला.
प्रचारादरम्यान, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार छायाताई पाटील यांनी शहरातील मूलभूत समस्यांवर प्रकाश टाकून नागरिकांशी थेट संवाद साधला. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नागरिकांचा मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीसाठी उत्साहवर्धक ठरत असून, निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे.



