जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात निवृत्तीवेतनधारकांना बनावट पत्रे आणि दूरध्वनी संदेशांच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे जाळे टाकले जात असल्याच्या घटना समोर आल्या असून, याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे. निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतनाशी संबंधित लाभ घेणाऱ्या नागरिकांनी कोणत्याही निनावी पत्रावर किंवा संशयास्पद फोन कॉलवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा कोषागारामार्फत राज्य शासनाच्या अधिनस्त असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना विविध निवृत्तीवेतन विषयक लाभ नियमितपणे वितरित करण्यात येतात. मात्र, अलीकडेच कोषागाराच्या नावाने बनावट पत्रे पाठवून किंवा मोबाईलवर संदेश व कॉल करून निवृत्तीवेतनधारकांकडून वैयक्तिक माहिती, बँक खात्याचे तपशील किंवा पैसे उकळण्याचे प्रकार घडत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. काही ठिकाणी या बनावट पत्रांमध्ये “आपला निवृत्तीवेतन थांबवण्यात येणार आहे” किंवा “तुमच्या खात्यात बदल करण्यासाठी OTP द्या” अशा प्रकारचे संदेश दिले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) सुभाष गुंजाळ यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, कोषागार कार्यालयाकडून कधीही फोन किंवा निनावी पत्राद्वारे बँक खात्याची माहिती, OTP, आधार क्रमांक किंवा अन्य गोपनीय माहिती मागितली जात नाही. अशा संदेशांवर विश्वास ठेवल्यास निवृत्तीवेतनधारक आर्थिक फसवणुकीचा बळी ठरू शकतात.
या प्रकारची फसवणूक झाल्यास जिल्हा कोषागार कार्यालय कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा घटनांमध्ये सावधगिरी बाळगून, कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी अधिकृत कोषागार कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.
निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन संदर्भात शंका अथवा अडचणी असल्यास प्रत्यक्ष कोषागार कार्यालयाशी संपर्क साधून खात्री करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.



