Home Cities मुक्ताईनगर अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीवेतन व प्रोत्साहन भत्त्यास मान्यता द्यावी; खडसे यांची परिषदेतील ठाम...

अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीवेतन व प्रोत्साहन भत्त्यास मान्यता द्यावी; खडसे यांची परिषदेतील ठाम मागणी


मुक्ताईनगर –लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित लाभांबाबत दीर्घकाळापासून नाराजी व्यक्त केली जात असताना, नागपूर येथे विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नाने पुन्हा एकदा जोरदार स्वरूप घेतले. सेविकांना निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती उपदान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रोत्साहनभत्ता तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी परिषद सदस्य आ. एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सरकारसमोर मांडली.

नागपूरच्या विधानपरिषद सभागृहात या विषयावर बोलताना खडसे म्हणाले की, अंगणवाडी सेविकांच्या लाभांविषयीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असला तरी विभागाने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित स्थितीत आहे. ऑक्टोबर २०२५ च्या सुमारास या सेविकांवर उपासमारीची वेळ ओढवेल, अशी भीषण परिस्थिती समोर येत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक सेविकांनी २६ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले होते.

खडसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सध्या कार्यरत तसेच सेवानिवृत्त होत असलेल्या अंगणवाडी सेविकांना लाभ मिळण्यात होणारा विलंब अन्यायकारक आहे. त्यामुळे निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती उपदान आणि लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रोत्साहनभत्त्याच्या प्रस्तावास तातडीने मान्यता देऊन शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली आहे, हे स्पष्ट करावे, अशी त्यांची मागणी होती.

यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर एकरकमी लाभ दिला जातो. तसेच पेन्शन आणि सेवानिवृत्ती उपदानाबाबत राज्य शासन स्तरावर सक्रिय विचारविनिमय सुरू असून याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल. लाडकी बहीण योजनेंतर्गत अनुज्ञेय प्रोत्साहनभत्ता सेविकांना वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound