जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्या २० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी कार्यालय परिसरात रस्त्यासह वाहनतळाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी वाहने उभी असल्याचे पाहिले. त्यातील काही वाहने कर्मचाऱ्यांची असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेतले आणि बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
या कारवाईत दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अनेकांनी जागेवरच दंड भरून पावती घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची बेशिस्तपणे वाहने उभी करण्याची समस्या गंभीर बनली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आता शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.