रोम-वृत्तसेवा । इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. क्षेपणास्त्र हल्ले, सायरनचे आवाज आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देश तणावाखाली आहेत. मात्र या अशांत काळात एक असा देश आहे, जिथे आजपर्यंत सायरन वाजलेलाच नाही आणि युद्धाचा थेट अनुभवही आलेला नाही. हा देश म्हणजे सॅन मरीनो.
इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता वाढत असताना, इटलीच्या कुशीत वसलेला सॅन मरीनो शांततेचा आदर्श म्हणून समोर येत आहे. अधिकृतपणे ‘मोस्ट सीरीन रिपब्लिक ऑफ सॅन मरीनो’ म्हणून ओळखला जाणारा हा देश जगातील सर्वात जुन्या प्रजासत्ताकांपैकी एक मानला जातो.

केवळ सुमारे ३४ हजार लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा देशाने आंतरराष्ट्रीय संघर्षांपासून स्वतःला दूर ठेवण्याची परंपरा जपली आहे. जगभरात युद्धजन्य परिस्थिती असताना, सॅन मरीनोने तटस्थतेचा मार्ग स्वीकारत शांततेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच आजही हा देश युद्धाच्या विळख्यात अडकलेला नाही.
सॅन मरीनोची स्थापना चौथ्या शतकात झाली असून, तेव्हापासून या देशाने कोणत्याही मोठ्या युद्धाचा सामना केलेला नाही. नेपोलियन बोनापार्ट युरोप जिंकण्याच्या मोहिमेवर असताना किंवा अडॉल्फ हिटलर यांच्या सैन्याने जगभरात विध्वंस माजवला असतानाही सॅन मरीनो सुरक्षित राहिला. यामागे त्याची भौगोलिक रचना आणि मुत्सद्दी धोरणे कारणीभूत ठरली आहेत.
या देशाने कधीही कोणत्याही मोठ्या लष्करी गटात सामील होण्याचा निर्णय घेतला नाही. त्याऐवजी शांतता करार आणि तटस्थ धोरणांचा अवलंब केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील वादळांपासून तो दूर राहिला आहे.
आर्थिकदृष्ट्याही सॅन मरीनोने वेगळा मार्ग स्वीकारला आहे. अनेक देश आपल्या जीडीपीचा मोठा हिस्सा संरक्षण आणि शस्त्रास्त्रांवर खर्च करतात, तर सॅन मरीनोने पर्यटनावर भर दिला आहे. येथील निम्म्याहून अधिक उत्पन्न पर्यटनातून मिळते. आजही या देशातील मध्ययुगीन वास्तू, सुंदर रस्ते आणि ऐतिहासिक स्थळांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात.
माउंट टिटानो या डोंगररांगेवर वसलेला हा देश सामरिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित मानला जातो. डोंगराळ भूप्रदेशामुळे परकीय सैन्याला येथे पोहोचणे कठीण ठरते. त्यामुळे इतिहासातही अनेक आक्रमणांपासून हा देश वाचला आहे.
आजच्या जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सॅन मरीनोचा आदर्श अधिक महत्त्वाचा ठरत आहे. तटस्थता, शांतता आणि संतुलित विकास यांचा संगम साधत या देशाने जगासमोर वेगळा मार्ग दाखवला आहे.



