Home Cities जळगाव पीस बिल्डर्स फोरम राष्ट्रीय परिषदेला जळगावात प्रारंभ

पीस बिल्डर्स फोरम राष्ट्रीय परिषदेला जळगावात प्रारंभ


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीस बिल्डर्स फोरम’ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. देशभरातील शांती कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या तीन दिवसीय परिषदेची सुरुवात झाली.

या उद्घाटन समारंभप्रसंगी कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डॉ. गीता धरमपाल, एकता परिषदेचे अध्यक्ष राजगोपाल, जिल कारहॅरीस, सावित्रीबेन, इंद्राजी आदी मान्यवर उपस्थित होते. ९ ते ११ मार्च दरम्यान होणाऱ्या या परिषदेत शांती निर्माण प्रक्रियेचे विविध आयाम, सामाजिक न्याय आणि परिवर्तन या विषयांवर सखोल चर्चा व संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच माहितीपट प्रदर्शन आणि विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून शांती निर्माणासाठी कार्यरत असलेल्या संस्थांचे अनुभवही मांडले जाणार आहेत.

या परिषदेत कॅनडा तसेच आंध्रप्रदेश, केरळ, बिहार, तामिळनाडू, ओडिसा, मणिपूर, नागालँड, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, झारखंड, तेलंगणा आणि गुजरातसह देशभरातील अनेक राज्यांतील पीस वर्कर सहभागी झाले आहेत. विविध सामाजिक संघर्षांमध्ये शांती, संवाद आणि लोकशाही मार्गाने समाधान शोधण्यासाठी कार्य करणाऱ्या या कार्यकर्त्यांचा अनुभव या परिषदेत मांडला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमात विशेष सांस्कृतिक सादरीकरणही करण्यात आले. डॉ. अपर्णा भट-कासार संचलित प्रभाकर कला संगीत अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी कथक नृत्याची सुंदर प्रस्तुती सादर केली. वंदे मातरम या गीताने नृत्याची सुरुवात झाली आणि देवी स्तुतीद्वारे आदिशक्तीला वंदन करण्यात आले. त्यानंतर सादर केलेल्या कृष्णभजनातून उपस्थितांना कृष्णभक्तीची अनुभूती देण्यात आली. महिलांना समर्पित असलेली विशेष कलाकृती श्रेया अग्रवाल, तेजस्विनी क्षीरसागर, संस्कृती गवळे, मधुरा इंगळे, दीपिका घैसास, समृद्धी पाटील, वरदा तळेले आदी विद्यार्थिनींनी सादर केली.

यावेळी डॉ. गीता धरमपाल यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संदेश देत गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. समाजात शांती, न्याय आणि परिवर्तन घडविण्यासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे समन्वयक जिल कारहॅरीस यांनी सांगितले की, शोध, संवाद, प्रशिक्षण आणि युवा सक्षमीकरणाच्या माध्यमातून समाजात शांती आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी एकता परिषद आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन महत्त्वाचे कार्य करत आहेत. महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार केल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी एकता परिषद आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने २०१६ मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय महिला परिषदेसंदर्भातील विशेष माहितीपटही प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपक मिश्रा यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.


Protected Content

Play sound