अहमदनगर, वृत्तसंस्था | लोकांना पर्याय हवा आहे. वेगळा पर्याय निर्माण होऊ शकतो हे महाराष्ट्राने दाखवून दिल्याने लोकांच्या नजरा महाराष्ट्राकडे आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मला पत्र पाठवून विरोधी पक्षाची बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. इतर लोकांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेऊ, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची पुन्हा मोट बांधणार असल्याचे संकेत दिले आहेत.
अहमदनगर दौऱ्यावर आले असता पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे संकेत दिले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया वाचण्यात आली. महाराष्ट्र आणि पवारांनी जो निर्णय घेतला त्यातून प्रेरणा मिळाल्याचे सोरेन यांनी म्हटले होते. आम्ही जो निर्णय घेतला तसा निर्णय इतर राज्यांनीही घ्यायला हवा. लोक पर्याय बघत आहेत, त्यांना पर्याय हवा आहे. कुठलाही एखादा पक्ष पर्याय देईल, अशी अवस्था आज नाही. त्यामुळे किमान समान कार्यक्रमावर पर्याय देता येऊ शकतो. लोक ते मान्यही करतात. किमान समान कार्यक्रमावर आधारित पर्याय लोकांना मान्य होईल, असा विश्वास जाणकार व्यक्त करीत आहेत, असेही पवार म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मला कालच पत्रं आले आहे. त्यांनी आम्हाला पुढाकार घेऊन एक बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. इतरांशी चर्चा करून काय करता येईल ते बघतो. बघू पुढे काय होते ते ? असेही पवार यांनी सांगितले. लोक महाराष्ट्राकडे आशेने बघत आहेत. एवढे मात्र निश्चित असेही पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्यातील खाते वाटपावरही भाष्य केले. कोणत्याही पक्षात कोणतीही नाराजी नाही. आठ दिवसांपूर्वीच खाते वाटप झाले आहे. कुणावर कोणती जबाबदारी द्यायची हे सुद्धा ठरले आहे. मुख्यमंत्री केव्हाही खातेवाटप जाहीर करतील, असे ते म्हणाले. तरुणांना आम्ही पुढे आणण्याचा निर्णय घतेला आहे. यावेळी राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने त्यांच्याकडे चार-पाच खाती देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा जास्त भार असेल, असेही ते म्हणाले.