मुंबई, वृत्तसंस्था | शरद पवार ही व्यक्ती राजकारणात काय करू शकते, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा राज्याला आणि देशाला आला. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात लढवय्या वृत्तीचा परिचय देणाऱ्या पवारांनी दरबारी राजकारणातही आपण किती पारंगत आहोत, याची झलक दाखवली आहे. आपल्या कूटनीतीने पुतण्या अजित पवार यांचे बंड मोडून काढतानाच एका रात्रीत सत्ता स्थापन केलेले सरकार ८० तासांत खाली खेचून पवारांनी भाजपच्या चाणक्यांना मात दिली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना युतीचे सरकार येईल, असे वाटत असतानाच सत्तावाटपावरून युतीमध्ये वाद झाला. हा वाद चिघळल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरू केली. त्यासाठी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी होऊन सरकार स्थापनेचा निर्णय झाला. मात्र, अजित पवार यांनी अचानक भाजपशी हातमिळवणी करून थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. ‘भाजपच्या चाणक्यांनी शरद पवारांना धक्का दिला… पुतण्याने काकांना कात्रजचा घाट दाखवला’, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, या सगळ्या घडामोडी घडत असताना शरद पवार शांत होते. मीडियासमोर मोजकेच बोलत होते. ‘फाटाफुटीचे असे राजकारण ५० वर्षांत खूप पाहिले आहे. भाजपचे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही, हे त्यांनी शपथविधीच्याच दिवशी सांगितले होते. पवार काहीतरी मोठी खेळी करणार याचे ते संकेत होते.
मधल्या काळात शिवेसना, काँग्रेस व राष्ट्रवादीने भाजपच्या सत्ता स्थापनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कायदेशीर लढाई सुरू असतानाच पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू होत्या. अजित पवारांसोबत गेलेल्या एकेका आमदाराला पवारांनी शिवसेनेच्या मदतीने पुन्हा आपल्या तंबूत परत आणले. अजित पवारांचा स्वभाव माहीत असलेल्या पवारांनी त्यांच्याशी पक्षाचे नेते व कुटुंबीयांमार्फत सातत्याने चर्चा सुरू ठेवली. त्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव वाढवत नेला. दुसरीकडे, १६२ आमदारांची ओळख परेड जनतेसमोरच घडवून भाजपला आणि बंडखोर अजित पवारांना सूचक संदेश दिला. त्यातच सर्वोच्च न्यायालयानं खुल्या पद्धतीने बहुमत चाचणी घेण्याचे आदेश फडणवीस यांना दिले. त्यामुळे पवारांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे पारडे आणखी जड झाले. आता आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात येताच अजित पवार यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीमुळे भाजपही हतबल झाला. दोन दिवसांपासून बहुमताचे दावे करणाऱ्या भाजपच्या गोटात नाराजी पसरली. फडणवीसांना पुन्हा एकदा राजीनामा द्यावा लागला.