Home धर्म-समाज देशभक्ती, एकता आणि शिस्त: सावद्यात स्वयंसेवकांचे संचलन ठरले लक्षवेधी!

देशभक्ती, एकता आणि शिस्त: सावद्यात स्वयंसेवकांचे संचलन ठरले लक्षवेधी!


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त येथील नगर उपखंडस्तरीय भव्य संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. २ ऑक्टोबर रोजी सावदा शहरात हे संचलन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले, ज्यामुळे संपूर्ण शहरात देशभक्ती आणि एकतेचे उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

या ऐतिहासिक संचलनात सावदा शहरातील तब्बल २३० स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. स्वयंसेवकांनी सांघिक शिस्तीचे उत्कृष्ट दर्शन घडवत शहरातील मुख्य मार्गांवरून संचलन केले. संघाच्या घोष पथकासह संचलनाचे आगमन होताच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने संचलनाचे अभूतपूर्व स्वागत केले.

शहरातील प्रत्येक घरातून नागरिकांनी आपल्या घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या, तर अनेक ठिकाणी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. संचलनाला मिळालेल्या या उत्कृष्ट प्रतिसादाने स्वयंसेवकांचा आणि आयोजकांचा उत्साह द्विगुणित झाला होता. संचलनामुळे भगव्या रंगाची आणि शिस्तीची छाप संपूर्ण शहरात पाहायला मिळाली.

संचलनाचा समारोप कोचुर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका हॉल येथे करण्यात आला. या ठिकाणी आयोजित बौद्धिक आणि समारोप कार्यक्रमास धर्मजागरण प्रमुख देवगिरी प्रांताचे सिद्धेश्वर बिराजदार आणि रावेर तालुका कार्यवाह जितेंद्रजी गवळी यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावदा येथील सेवानिवृत्त नायक सुभेदार मधुकर आनंदा कोळी लाभले होते. कोळी यांनी आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. या भव्य आयोजनामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या उत्साहाचे दर्शन सावदा शहराला घडले, तसेच स्वयंसेवकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली.


Protected Content

Play sound