जळगाव प्रतिनिधी । खेडगाव (ता. भडगाव) येथील आयटीबीपी अर्थात इंडो तिबेटियन पोलीस सेनेत कार्यरत असलेल्या सुनील यशवंत हिरे (वय ४०) या जवानाला मंगळवारी सेवा बजावताना वीरमरण आले होते. गुरुवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज त्यांच्या मुळगावी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वंन केले. यावेळी आमदार किशोर पाटील उपस्थित होते.
आयटीबीपीच्या आसाम बटालियनमधे कार्यरत असलेले सुनील यशवंत हिरे यांना मंगळवारी सेवा बजावत असताना वीर मरण आले ते सध्या आसाम येथे कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी (ता. 24 ) रोजी शासकीय इतमामात सकाळी १० वाजता खेडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सायंकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खेडगाव येथे जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची पत्नी, आई, वडील व दोन मुलांचे सात्वंन करीत त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तर जवान सुनील हिरे यांच्या निधनाबद्दल दुख: व्यक्त केले. यावेळी आमदार किशोर पाटील, डाॅ. विलास पाटील, संजय पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.