पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज लागलेल्या निकालात मविआच्या पॅनलने आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांच्या पॅनलचा दारूण पराभव केला आहे.
पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मोठी चुरस पाहण्यास मिळाली. यात मावळते कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा विद्यमान जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी पहिल्यापासून जोरदार मोर्चेबांधणी केली होती. यातच त्यांचे प्रतिस्पर्धी तथा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील तसेच त्यांच्या सौभाग्यवतींचा अर्ज बाद ठरविण्यात आल्याने विरोधकांची ताकद कमकुवत झाल्याचे मानले जात होते.
दरम्यान, डॉ. सतीश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणातून बाद झाल्यानंतर ठाकरे गटाने नेते डॉ. हर्षल माने यांनी पॅनलची जबाबदारी सांभाळली. दोन्ही पॅनलतर्फे प्रचारात आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज सकाळी पारोळा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली. यात मविआ प्रणीत पॅनलने १५ जागांवर विजय संपादन केला. यात मावळते सभापती तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल चिमणराव पाटील यांना देखील पराभवाचा धक्का बसला. विजय जाहीर होताच मविआच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.
आमदार चिमणराव पाटील यांची सहकारावर मजबूत पकड मानली जाते. गेल्या दोन पंचवार्षिकपासून त्यांच्याकडेच पारोळा बाजार समिती होती. यामुळे यंदाच्या निवडणुकीत झालेला पराभव हा त्यांना मोठा धक्का मानला जात आहे.