Home राजकीय राज्यात भीक मागण्यावर बंदीचा मार्ग मोकळा; विधान परिषदेत गोंधळात विधेयक मंजूर

राज्यात भीक मागण्यावर बंदीचा मार्ग मोकळा; विधान परिषदेत गोंधळात विधेयक मंजूर

0
116

नागपूर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यात भीक मागण्यास प्रतिबंध घालण्याच्या दिशेने सरकारने निर्णायक पाऊल टाकले असून, विधानसभेनंतर आता विधान परिषदेतही हे महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर झाले आहे. मात्र, हे मंजुरीचे काम शिस्तबद्ध वातावरणात न होऊन गोंधळातच पार पडले. यामुळे सभागृहातील अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून पुढील रणनीतीसाठी शनिवारी सभापतींच्या दालनात महत्त्वाची बैठक होणार आहे.

विधान परिषदेत मांडण्यात आलेले महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध विधेयक राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सादर केले. विधेयक मांडणीदरम्यान सभागृहात अनेक सदस्यांनी आपल्या शंका, हरकती आणि असमाधानाची नोंद केली. शिवसेना आमदार मनिषा कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी तसेच तालिका सभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रक्रिया आणि विधेयकातील तरतुदींविषयी स्पष्ट तीव्र नाराजी व्यक्त केली.

विधेयकाच्या शीर्षकात ‘महारोगी’ शब्द वगळण्याचा प्रस्ताव असताना प्रत्यक्ष विधेयकाच्या मजकुरात त्याचा ताळमेळ दिसत नसल्याचे निरीक्षण ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसेंनी नोंदवले. तसेच, विधेयकासंदर्भात वितरित करण्यात आलेल्या स्पष्टीकरण पुस्तिकेतील माहिती अपुरी आणि संभ्रम निर्माण करणारी असल्याचे मत तालिका सभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

सभागृहातील अनेक सदस्यांनी असमाधानाची स्पष्ट भूमिका मांडल्यानंतरही गोंधळाच्या परिस्थितीतच विधेयक मंजूर करण्यात आले. यामुळे या निर्णयावर पुढील प्रक्रिया आणि संवाद साधण्यासाठी शनिवारी विधान परिषद सभापतींच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, त्यात नाराज सदस्यांची मते ऐकून पुढील पावले तय केली जाणार आहेत.

राज्यात भीक मागण्यावर बंदी आणण्याचा निर्णय सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असला, तरी प्रक्रियेत पारदर्शकता आणि संवादाचा अभाव असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा विषय आगामी बैठकीत पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound