Home टेक्नोलॉजी स्मार्ट अल्गल बायोमास डिव्हाइसला पेटंट मंजुरी

स्मार्ट अल्गल बायोमास डिव्हाइसला पेटंट मंजुरी


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून अभिमानास्पद अशी मोठी कामगिरी समोर आली असून ऐनपूर आणि फैजपूर येथील प्राध्यापकांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या ‘स्मार्ट अल्गल बायोमास प्रोडक्शन अँड हार्वेस्टिंग डिव्हाइस’ या अत्याधुनिक उपकरणाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयांतून झालेले हे संशोधन नव्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

या संशोधनामध्ये सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर आणि धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील प्राध्यापकांचा मोलाचा सहभाग असून डॉ. सतीश आधार पाटील, प्रा. शिवाजी प्रल्हादराव मगर, डॉ. संजय भागवत पाटील आणि डॉ. जयश्री केशव पाटील यांनी एकत्रितपणे हे उपकरण विकसित केले आहे. वनस्पतीशास्त्र विषयातील त्यांच्या सखोल अभ्यास आणि संशोधनातून हे यंत्र साकार झाले आहे.

‘स्मार्ट अल्गल बायोमास प्रोडक्शन अँड हार्वेस्टिंग डिव्हाइस’ हे अत्याधुनिक, कॉम्पॅक्ट आणि औद्योगिक दर्जाचे उपकरण असून त्यामध्ये आडव्या सिलिंड्रिकल फोटोबायोरिऍक्टरच्या साहाय्याने मायक्रोअल्गीची नियंत्रित वाढ केली जाते. प्रकाश, तापमान, pH, ऑक्सिजन आणि पोषक द्रव्यांचे नियमन सेन्सर्स आणि कंट्रोल युनिटद्वारे स्वयंचलितपणे केले जाते. यामध्ये अंतर्गत रोटरी इम्पेलरद्वारे जैवभार सुरक्षितपणे संकलित केला जातो, तर फिल्ट्रेशन प्रणालीमुळे पोषक द्रव्यांचा पुनर्वापर शक्य होतो.

हे यंत्र सतत तसेच बॅच मोडमध्ये कार्यरत राहू शकते आणि बायोफ्युएल, न्यूट्रास्युटिकल्स तसेच सांडपाणी प्रक्रियेसाठी पर्यावरणपूरक उपाय म्हणून उपयुक्त ठरते. वाढते प्रदूषण आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर शैवालापासून मिळणारा बायोमास हा भविष्यातील ऊर्जा स्रोत मानला जात असल्याने या उपकरणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. सौर ऊर्जेच्या वापरासह आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित केलेले हे ‘स्मार्ट’ साधन कृषी व ऊर्जा क्षेत्रातील संशोधनाला चालना देणारे ठरणार आहे.

या यशामुळे खान्देशातील दोन्ही महाविद्यालयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांमधूनही उच्च दर्जाचे संशोधन घडू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.

या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूर संस्थेचे अध्यक्ष शिरीषदादा चौधरी, उपाध्यक्ष डॉ. सुधाकर चौधरी व मिलिंद वाघुळदे, चेअरमन लीलाधर चौधरी, व्हा. चेअरमन किशोर चौधरी, सचिव मुरलीधर फिरके, सहसचिव नंदकुमार भंगाळे तसेच संस्थेचे सदस्य आणि ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी यांनी प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे. धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे आणि सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जसवंत बाबुराव अंजने यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound