मतदार याद्यांचा पुन:रिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हा-जिल्हाधिकारी

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी|भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून २५ व २६ नोव्हेंबर, २०२३ या दिवशी विशेष शिबिराचे प्रत्येक मतदान केंद्रावर आयोजनही करण्यात आले आहे.

या कालावधीत संबंधित यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांना मदत करण्यासाठी पूर्णवेळ उपस्थित राहणार असून नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन निवडणूक विभागास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रत्येक मतदान केंद्रावर व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रारुप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही? याची खात्री मतदारांनी करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी आपला फॉर्म नमुना-६ म्हणजेच मतदार नांव नोंदणीसाठी आवश्यक नमुना फॉर्म भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावा.

ज्या व्यक्तीचे १ जानेवारी, २०२४ रोजी वय १८ वर्ष पूर्ण होत आहे, परंतु मतदार यादीत नांव नाही अशा व्यक्तीने आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करुन घेण्यासाठी फॉर्म नमुना ६ भरुन द्यावा. सदर अर्हता दिनांकाला १८ वर्ष वय पूर्ण करणा-या मतदाराचे नाव त्या – त्या अर्हता दिनांकाला मतदार यादीमध्ये समाविष्ट केले जाईल. तसेच https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर अथवा Voter Help line App द्वारे सुध्दा मतदार आपली नाव नोंदणी करु शकतात.

मतदार संघातील एका यादी भागातून दूस-या यादी भागात स्थलांतर झाले असल्यास नवीन यादी भागात नाव समाविष्ट करण्यासाठी व एका मतदार संघातून दुस-या मतदार संघात नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 8 भरून द्यावा. ज्या मतदाराच्या मतदार यादीतील तपशिलात (नांव, वय, लिंग, फोटो) इ. मध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करून घेण्यासाठी फॉर्म नमुना-8 भरुन द्यावा.

जिल्ह्याच्या मतदार यादीतील मयत, दुबार, आणि स्थलांतरीत मतदारांच्या नावांची वगळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदारांनी स्वतः पुढाकार घ्यावा. मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नांवे मतदार यादीमधून वगळण्याची कार्यवाही करावी. कुंटुंबातील एखादी व्यक्ती मयत झाली असल्यास त्या व्यक्तीचे नांव मतदार यादीमधून वगळण्यासाठी मृत्युच्या दाखल्यासह फॉर्म नमुना-7 भरुन द्यावा. जिल्ह्यात मतदार यादीत ज्या मतदारांचे नावे दुबार आहेत, अश्या दुबार मतदारांनी आपण ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे वास्तव्य करतो, त्या ठिकाणी मतदार यादीत नांव कायम ठेवून उर्वरीत ठिकाणची नावे वगळणेसाठी फॉर्म नमुना-7 भरुन दयावा. मतदाराचे जर बदली किंवा इतर कारणामुळे स्थलांतर झाले असल्यास त्याने पूर्वीच्या ठिकाणच्या नांवाची वगळणी करावी व नवीन रहिवासाच्या ठिकाणी नांव मतदार यादीत समाविष्ट करावे.

युवा मतदारांची नांव नोंदणी वाढविण्यासाठी संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयात Campus Ambassador यांची नियुक्ती करून महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे वय दिनांक १ जानेवारी, २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण झाले आहे, परंतु मतदार यादीत नांव नाही अशा विद्यार्थाची नांव नोंदणी करून घ्यावी, यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी सर्व महाविद्यालयात विशेष मोहिमेचे आयोजन करणार आहेत.

पुनःरिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्वाचा असून राजकीय पक्षांनी आपले प्रतिनिधींची मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएचए) म्हणून नेमणूक करावी. १ जानेवारी,२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम असल्यामुळे जिल्हयातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या परिसरात संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे किंवा कसे? याची तपासणी करण्याकरीता विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन सदर पुनःरिक्षण कार्यक्रम जळगाव जिल्हयामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे. असेही आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले आहे.

Protected Content