जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नांदेड येथे होणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी समागम कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल तसेच निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले की, नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शहिदी समागमासाठी देशभरातून तसेच राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येणार असून जळगाव जिल्ह्यातूनही शीख, सिकलगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहिवाल, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव वारकरी संप्रदायातील भाविक सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सर्व तालुक्यांत जनजागृतीसाठी चित्ररथ फिरविण्यात येत असून गावोगावी दवंडी देऊन नागरिकांना कार्यक्रमाबाबत माहिती दिली जात आहे. तसेच जिल्ह्यातील चित्रपटगृहे, शाळा व महाविद्यालयांमध्ये शहिदी समागमाच्या अनुषंगाने सरताज यांनी गायलेली प्रेरणादायी गीते वाजविण्यात येत आहेत.
शाळांमध्ये वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १५ विद्यार्थ्यांना तसेच ५ संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये ५ विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री, ५ विद्यार्थ्यांना पालकमंत्री तर ५ विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
भाविकांच्या सोयीसाठी नोंदणीकृत सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून वाहन व्यवस्था, पिण्याचे पाणी, चहा-नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांच्या प्रवासापासून कार्यक्रमातील सहभाग आणि परतीपर्यंत संपूर्ण समन्वय साधण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावर आतापर्यंत पाच बैठका तर तालुकास्तरावरही नियोजन बैठका पार पडल्या आहेत.
नांदेड येथे जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू करण्याबाबत भुसावळ व नांदेड विभागाचे डी.आर.एम. तसेच राज्य शासनाकडे पत्रव्यवहार व दूरध्वनीद्वारे मागणी करण्यात आली आहे. विशेष रेल्वे सुरू झाल्यास जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांनाही याचा लाभ होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नांदेड येथे होणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ शहिदी समागमाच्या प्रचारासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या माहितीपर चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. हा चित्ररथ जळगाव शहर व परिसरात फिरवून कार्यक्रमाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.



