मुंबई-वृत्तसेवा । ईशान्य मुंबईतील मुलुंड (पश्चिम) परिसरात शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकामाधीन मेट्रो रेल्वेच्या खांबाचा एक भाग अचानक कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोसळलेल्या सिमेंटच्या भागाखाली दोन वाहने चिरडली गेली.
ही घटना दुपारी सुमारे १२:२० वाजण्याच्या सुमारास एलबीएस रोडवरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसमोर घडली. मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान खांबाचा सिमेंटचा भाग तुटून थेट रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर आणि अन्य वाहनावर कोसळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने जखमींना त्वरित बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी परिसराला वेढा घालत वाहतूक वळवली आणि ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले.
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बांधकामादरम्यान मेट्रोच्या खांबाचा सिमेंटचा भाग तुटून रिक्षावर पडल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात जखमी झालेल्या चार जणांपैकी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातावेळी त्या ठिकाणी आवश्यक बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बॅरिकेड्स हटवण्यात आल्याचे सांगितले जात असून यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सध्या पोलिस आणि संबंधित यंत्रणा अपघाताचे नेमके कारण तपासत असून बांधकामादरम्यान सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचाही सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.