रायगड । महाविकास आघाडी सरकारच्या काळात माणसं सुरक्षित नाहीत, पक्षी सुरक्षित नाहीत.राज्यात पोपट मरतायत, कावळे, बगळे, पशु पक्षी देखील मरायला लागलेत. या राज्यात फक्त महाविकास आघाडी सुरक्षित आहे, असा टोला प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे. ते रायगड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारनं सुरक्षा काढल्याच्या निर्णयावरुन टीकास्त्र सोडलं आहे. हा खरं म्हणजे सूड भावनेने घेतलेला निर्णय आहे. राजकीय नेत्यांना दिलेली सुरक्षा सविंधानानं दिलेला प्रोटोकॉल आहे. देवेंद्र फडणवीस किंवा मी सुरक्षा मागितली नव्हती. आतापर्यंत सुरक्षेच्याबाबतीत राजकीय निर्णय झाला नव्हता. आमची सुरक्षा काढली तरी हरकत नाही. आम्ही जनतेत फिरत राहणार, आमच्यावर दबाव आणला तरी फरक पडणार नाही. मात्र, राज्यातील जनतेच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं, सुरक्षा कपातीसारख्या राजकीय उठाठेवी करण्यापेक्षा जनतेच्या हिताकडं लक्ष द्यावं, असंही प्रविण दरेकर म्हणाले. राज्यात सरकारच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकं दगावत आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात माणसं सुरक्षित नाहीत, पक्षी सुरक्षित नाहीत.राज्यात पोपट मरतायत, कावळे, बगळे, पशु पक्षी देखील मरायला लागलेत. या राज्यात माणसं सुरक्षित नाहीत फक्त महाविकास आघाडी सुरक्षित आहे, असा टोला प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे. राज्य सरकारनं सुरक्षेच्या कवचातून बाहेर यावं आणि जनतेसाठी काम करावं, असं प्रविण दरेकर म्हणाले.