पारोळा प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी एरंडोल विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी १८ खोल्यांना मंजुरी मिळाली आहे. याच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे.
एरंडोल विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वाढीव शाळा खोल्यांची कधीपासूनच मागणी होत होती. खोल्यांच्या कमतरतेमुळे एकाच खोलीत २ ते ३ वर्ग चालवावे लागत होते. एकाच खोलीत २ ते ३ वर्ग भरल्यामुळे विद्यार्थ्यांची खोलीत गर्दी होत होती. तर गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तसेच शाळांमध्ये खोल्यांचा कमतरतेमुळे इतर अडचणी ही येत होत्या.
या अनुषंगाने आमदार चिमणराव पाटील यांनी एरंडोल विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या १८ नव्याने खोल्या बांधण्यासाठी तब्बल १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून पारोळा तालुक्यात मंगरूळ २, भोंडण १, धूळपिंप्री १, शेवगे तांडा १, सावरखेडे तुर्क २ तर; एरंडोल तालुक्यात गालापूर २, केवडीपुरा ३, पद्मालय १, नागदुली २, पिंपळकोठा सिम २, टोळी खुर्द १ शाळा खोल्या बांधण्यात येणार आहेत.