पारोळा प्रतिनिधी । प्रवासी वाहतूक करणार्याकडून तीनशे रूपयांची लाच घेतांना पारोळा पोलीस स्थानकात कार्यरत सहाय्यक फौजदार जगदीश विनायक पवार यांना एसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पारोळा ते अमळनेरच्या दरम्यान प्रवासी वाहतूक करणार्याकडून सहाय्यक फौजदार जगदीश पवार यांनी तीनशे रूपयांची लाच मागितली होती. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या नाशिक येथील कार्यालयात तक्रार केली होती.
या तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला. या अनुषंगाने जगदीश विनायक पवार यांना तीनशे रूपये स्वीकारतांना अटक करण्यात आली. ही कारवाई नाशिक एसीबीचे पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, किरण रासकर, प्रकाश महाजन, गरूड, गांगुर्डे यांच्या पथकाने केली.