Home प्रशासन नगरपालिका गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पारोळा पालिकेचा अनोखा उपक्रम 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पारोळा पालिकेचा अनोखा उपक्रम 


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी नववर्षाच्या शुभारंभाचा गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत पारोळा नगरपालिकेने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कौतुकास्पद उपक्रम राबवला. नगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी आपला एक दिवसाचा भत्ता देत विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला.

चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या पूर्वसंध्येला लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत भिकनराव पाटील, उपनगराध्यक्ष अॅड. रोहन मोरे तसेच नवनियुक्त नगरसेवक व नगरसेविकांनी आपला एक दिवसाचा सभा आतिथ्य भत्ता दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अर्पण केला. या निधीतून किराणा साहित्याचे वाण घेऊन विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात काही प्रमाणात दिलासा मिळाला.

या उपक्रमामुळे केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

दरम्यान, कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येकडेही लक्ष देण्यात आले. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन अडचणी कमी झाल्या.

सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगर परिषद प्रशासन कटिबद्ध असल्याचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांना पाठबळ देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास पारोळा नगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी यामिनी जटे, लेखापाल दिपक महाजन, अंतर्गत लेखा परीक्षक सार्थक मोरस्कर, वरिष्ठ लिपिक किशोर चौधरी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन, संकेत पाटील यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound