Home Cities पारोळा पारोळा नगरपरिषद पदग्रहण सोहळा: नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी घेतला पदभार!

पारोळा नगरपरिषद पदग्रहण सोहळा: नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी घेतला पदभार!

0
259


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकत्याच पार पडलेल्या पारोळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर, आज महायुतीचे नवनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. पारोळा शहराच्या विकासाची धुरा आता अधिकृतपणे नवनिर्वाचित मंडळाच्या हाती सोपवण्यात आली आहे.

ऐतिहासिक विजयानंतर भव्य सोहळा :
२१ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, पारोळ्यातील मतदारांनी महायुतीवर प्रचंड विश्वास दर्शवत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यासह १९ नगरसेवकांना निवडून दिले. या विजयाचे औचित्य साधून आज शहरातील महाराणा प्रताप चौक येथे आमदार अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

आ.अमोल पाटील यांचा मोलाचा सल्ला :
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अमोल पाटील भावूक झाले. ते म्हणाले की, “जनतेने दिलेला हा कौल म्हणजे आपल्या विकासकामां प्रती असलेली पावती आहे. मात्र, या विजयानंतर आपली जबाबदारी अधिक वाढली आहे.” त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना स्पष्ट निर्देश दिले की, नगरपालिकेत येणाऱ्या शेवटच्या घटकाचे काम प्राधान्याने झाले पाहिजे. पारोळा शहराला केवळ विकसितच नाही, तर स्वच्छ, आदर्श आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्वांनी राजकीय मतभेद विसरून एकदिलाने काम करावे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

विकासाचा ‘रोडमॅप’ तयार :
आमदारांनी आपल्या भाषणात भविष्यातील व्हिजन स्पष्ट केले. प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा आणि पारदर्शक प्रशासन यावर भर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह अनेक माजी पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि मान्यवरांची उपस्थिती :
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, सुरेंद्रभाऊ बोहरा, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, भाजपा शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण शहर ‘महायुती’च्या जयघोषाने आणि गुलालाने न्हाऊन निघाले होते. नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जनतेचे आभार मानत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.


Protected Content

Play sound