पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरात थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी पारोळा नगरपरिषदेने आता ॲक्शन मोड घेत धडक मोहीम सुरू केली आहे. नगरपरिषदेच्या वारंवार सूचना देऊनही अनेक नागरिकांनी थकबाकी भरली नसल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून थकबाकीदारांवर थेट कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील थकबाकीदार नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुलीसाठी सात विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून शहरातील थकीत मालमत्ता कर व नळपट्टी धारकांची तपासणी करून त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. नगरपरिषदेच्या वतीने यापूर्वी अनेकदा बिल, जप्तीपूर्व सूचना तसेच तोंडी व लेखी नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात थकबाकीदारांनी कर भरणा न केल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

दि. १२ मार्च २०२६ रोजी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक संजय गिते यांच्या नेतृत्वाखाली विशेष वसुली पथकाने कुरेशी मोहल्ला आणि सिद्धार्थ नगर परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान थकबाकीदार नागरिकांचे एकूण १३ नळ कनेक्शन बंद करण्यात आले. नगरपरिषदेच्या वतीने अशा प्रकारची कारवाई पुढील काळातही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या विशेष वसुली मोहिमेत अनिल तिदमे (आस्थापना), दीपक महाजन (अंतर्गत लेखापरीक्षक), सार्थक मोरस्कर (अंतर्गत लेखापरीक्षक), संकेत कार्ले (पाणीपुरवठा अभियंता), सुमित पाटील (स्थापत्य अभियंता), विशाल गायकवाड (वसुली लिपिक), विश्वास पाटील, कैलास वानखेडे, शुभम कंखरे, भूषण महाजन, राहुल पाटील यांच्यासह नगरपरिषदेचे इतर कर्मचारी सहभागी झाले होते.



