नवी दिल्ली वृत्तसंस्था । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी आपल्यांवरील दाखल प्रकरणांची सुनावणी महाराष्ट्राबाहेर करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी अनिल देशमुख यांच्या विरोधात पत्र लिहिल्यानंतर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र तपास यंत्रणांनी प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंह यांनी केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली आहे.
याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.रामसुब्रमण्यम यांच्यासमोर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. परमबीर सिंह यांच्या बाजूनं वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी यांनी परमबीर सिंह यांच्यावतीनं युक्तिवाद केला आहे. तरी देखील सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली. “तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्ही तब्बल 30 वर्षे महाराष्ट्राची सेवा केली. मात्र आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या राज्याच्या कारभारावर विश्वास नाही? हा धक्कादायक आरोप आहे!”, असं सुप्रीम कोर्ट म्हणाले.
तुम्हाला फौजदारी कायद्याचे ज्ञान आहे. तुमच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरवर आम्ही स्थगिती द्यावी का? आम्ही सर्व एफआयरबद्दल बोलत नाही. एफआयरासाठी न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्याकडे जावा, असं कोर्टानं सांगितलं. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगडं मारु नयेत, असं म्हटलं.