पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ऑलिम्पिक खेळानंतर १७ दिवसानंतर पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक खेळ २८ ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू झाले आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्टेडियमबाहेर आयोजित समारंभात त्याचे उद्घाटन केले. या खेळांच्या इतिहासात प्रथमच उद्घाटन सोहळा स्टेडियमबाहेर झाला.
या समारंभात हजारो खेळाडूंनी परेड ऑफ नेशन्समध्ये भाग घेतला. परेड चॅम्प्स-एलिसेस अव्हेन्यू येथून सुरू झाली आणि प्लेस दे ला कॉन्कॉर्डकडे निघाली. या ऐतिहासिक चौकाच्या आजूबाजूला बांधलेल्या स्टँडवरून सुमारे ५० हजार लोकांनी हा सोहळा पाहिला.
२०२१ मध्ये टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने ५ सुवर्णांसह विक्रमी १९ पदके जिंकली आणि क्रमवारीत २४ व्या स्थानावर राहिला. तीन वर्षांनंतर, सुवर्णपदकांची संख्या दुहेरी अंकात नेण्याचे आणि एकूण २५ हून अधिक पदके जिंकण्याचे भारताचे लक्ष्य आहे. भारत यावेळी १२ खेळांमध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे भारताच्या कामगिरीवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे.