मुंबई (वृत्तसंस्था) पंकजांशी आमचे बोलणे झाले आहे. पंकजा मुंडे कालही भाजपात होत्या, आजही आहेत, उद्याही राहतील, अशा स्पष्ट शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भाजप सोडण्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शनिवारी फेसबुकवर एक पोस्ट टाकत राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. तर सोमवारी त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून भाजपचा उल्लेख काढून टाकला. त्यातच “पंकजा मुंडेंच काय तर भाजपचे बडे नेते आमच्या संपर्कात आहेत,” असा खळबळजनक शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे मुंडे भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या सगळ्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. पंकजा मुंडेंच्या पक्ष बदलाबाबत होणाऱ्या चर्चा अफवा असल्याचे ते म्हणाले.