चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला दिल्ली येथे एका भव्य समारंभात ‘एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार, भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव श महावीर सिंघवी आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले आणि मुख्याध्यापक व्ही.आर. पाटील यांना या पुरस्कारासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया:
या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातील नामांकित शाळांचे विविध मुद्द्यांच्या आधारे परीक्षण करण्यात आले. संस्थेतील संचालक मंडळाने शालेय गुणवत्तेसाठी उपलब्ध करून दिलेल्या भौतिक सुविधा, मागील पाच वर्षांतील विद्यार्थी संख्येचा वाढता आलेख, शून्य टक्के विद्यार्थी गळती, महिला सक्षमीकरणासाठी राबवलेले उपक्रम, विद्यार्थ्यांची सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरा वापर, शालेय गुणवत्ता, शाळेने राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेले कार्य, स्वच्छतेसाठी शाळेने केलेले प्रयत्न, शाळेने राबवलेले वृक्षारोपण कार्यक्रम, शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतील यश, दहावी व बारावीच्या परीक्षेमधील निकाल व गुणवत्ता, रात्र अभ्यासिका, शिक्षकवृंदाची अध्यापनाची पद्धती व प्रशिक्षणे, एन.ई.पी. 2020 बद्दल शाळेने राबवलेले विविध उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा शाळेने केलेला वापर आणि सहभाग इत्यादी निकषांवर शाळांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातून निवड:
या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 5 शाळांची निवड करण्यात आली होती. त्यात नॉन मेट्रो ग्रुपमधून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या गटात पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची निवड झाली. एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्डसाठी निवड झाल्याबद्दल केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजुमदार यांनी संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशंसा केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाशदादा राणे, संचालक पंकजभैया बोरोले, नारायण दादा बोरोले, सर्व संचालक मंडळ आणि सर्व शाखांचे विभाग प्रमुख यांनी पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.आर. पाटील, शिक्षक व कर्मचारीवृंद यांचे अभिनंदन केले.