जळगाव-संदीप होले ( लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट ) | शिवपुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या लोकप्रियतेबाबत नव्याने सांगण्याची काही आवश्यकताच नाही. आता यातच त्यांनी शनिवारी ऑनलाईन रूद्राभिषकेच्या माध्यमातून एकाच वेळेस कोट्यवधी भाविकांना यात सहभागी करून घेतले असून याला जगभरातून उदंड प्रतिसाद लाभला आहे. तर स्थानिक पातळीवर देखील हजारो घरांमध्ये रूद्राभिषेक करण्यात आला.
एक लोटा जल सब समस्या का हल या उक्तीला देशच नव्हे तर जगभरातील हिंदू धर्मियांमध्ये लोकप्रिय करण्याचे काम करतांनाच शिवभक्तीला नवीन आयाम देणारे महनीय व्यक्तीमत्व म्हणून पंडित प्रदीप मिश्रा यांची ख्याती आहे. ते ठिकठिकाणी शिवपुराण कथांचे आयोजन करत असून याला लक्षावधी भाविकांची उपस्थिती असते. तर दूरचित्रवाणी वाहिन्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याचे प्रक्षेपण कोट्यवधी भाविकांपर्यंत पोहचते. भगवान शिव यांची भक्ती आणि याच्याशी संबंधीत अनुष्ठानांच्या माध्यमातून त्यांनी देश-विदेशात मोठा भक्त वर्ग निर्मित केलेला आहे. आता याच प्रदीप मिश्रा यांनी दिनांक १५ जुलै रोजी रात्री नऊ ते दहा या कालावधीत रूद्राभिषेकाचे ऑनलाईन आयोजन केले.
यात पंडित प्रदीप मिश्रा हे राजस्थानातल्या अलवर शहरात सुरू असलेल्या श्री त्याग शिव महापुराण कथेच्या ठिकाणावरून सहभागी झाले. त्यांनी या रूद्राभिषक पूजेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. अर्थात, यासाठी त्यांनी अनेक दिवसांच्या आधीच रूद्राभिषेकासाठी काय सामग्री लागेल याची माहिती देऊन ठेवली होती. यानंतर त्यांनी प्रत्यक्ष दूरचित्रवाणी आणि सोशल मीडियातील लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून भाविकांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून रूद्राभिषेक करून घेतला. यासाठी भाविकांनी सकाळपासूनच तयारी सुरू केली होती.
रात्री बरोबर नऊ वाजता पंडित प्रदीप मिश्रा आणि त्यांच्या सहकार्यांनी रूद्राभिषेक सुरू केला. यानंतर घरोघरी याचेच अनुकरण करण्यात आले. या पूजनात धोतरा, गुलाब फुल आदींसह अन्य विविध सामग्रीचा उपयोग करण्यात आला. सुमारे तासभराचा अभिषेक आणि पुजेनंतर शेवटी आरती करण्यात आली. यासाठी प्रत्येक घरी शिवलींग तयार करण्याच्या विधीसह अभिषेकाची प्रक्रिया देखील पंडितजींनीच सांगितली. त्यांनी आस्था या दूरचित्रवाणी वाहिनीसह डीडी-१ या दुरदर्शनाच्या वाहिनीवरून एक तासभर भाविकांना मार्गदर्शन केले. यासोबत त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज आणि युट्युब चॅनलवरून देखील याचे प्रसारण करण्यात आले.
पंडित प्रदीप मिश्रा यांनी या आधी देखील ऑनलाईन रूद्राभिषेकाचे आयोजन केले असले तरी या वेळेस याला अतिशय व्यापक प्रमाणात प्रसिध्दी मिळाली. यामुळे अर्थातच यात भाविक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले. कोट्यवधी घरांमध्ये रूद्राभिषेक करत श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जयघोष ऐकू आला. उत्तर भारतात आधीच श्रावण महिना सुरू झाला असून आपल्या कडे लवकरच सुरू होत आहे. श्रावण महिना हा शिवभक्तीचा मानला जात असून यामुळे रूद्राभिषेकाला उदंड प्रतिसाद मिळाल्याचे मानले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात देखील भाविक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले. आमच्या ठिकठिकाणच्या तालुका प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक ठिकाणी रूद्राभिषेकात हजारो भाविकांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले आहे. यंदा डिसेंबर महिन्यात जळगाव येथे प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराणाचे आयोजन करण्यात आले असून याला देखील लक्षणीय प्रतिसाद लाभण्याची शक्यता आहे.
पंडित प्रदीप मिश्रा यांना सोशल मीडियात देखील मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. या चाहत्यांमध्ये देखील ऑनलाईन रूद्राभिषेकाबाबत मोठा उत्साह दिसून आला. अगदी याच्या तयारीपासून ते पूजा होऊपर्यंतचे सर्व अपडेट सोशल मीडियात ट्रेंडींगला आले आहेत. तर अनेकांनी रूद्रभिषेक केल्यानंतरची छायाचित्रे आणि व्हिडीओज सोशल मीडियात व्हायरल केले आहेत.