पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील पळासखेडा येथील तरूणाचा शेततळ्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी पारोळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पळासखेडे येथील प्रमोद राजाराम पाटील (वय-23) हा तरूण सकाळी शेतात कामानिमित्त गेला होता. दुपारी उशीरापर्यंत घरी न आल्याने त्याचे वडीलांनी शेतात इतरत्र शोध घेतला असता शेतमालक दत्तू सुभाष पाटील यांचे मालकीचे शेत तळ्यात पडलेला दिसला. त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांची हालचाल होत नव्हती त्याच्या वडिलांनी आरडाओरड करून लोकांच्या मदतीने त्यास बाहेर काढून कुटीर रुग्णालय पारोळा येथे खाजगी वाहनाने आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जयवंत पाटील हे करीत आहे.