मुंबई, वृत्तसंस्था | पाकिस्तानी कमांडोज समुद्री मार्गाने गुजरात आणि महाराष्ट्रात शिरकाव करण्याची शक्यता असून त्यांचा भारतात दंगली घडवून आणण्याचा डाव असल्याचे सांगत तटरक्षक दल आणि अदानी पोर्ट्स कंपनीने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
गुजरातच्या कच्छमधील हरामी नाला खाडीतून काही दहशतवादी भारतात शिरल्याने मुंद्रासह सर्व बंदरांना तटरक्षक दलाने सकाळीच सावधानतेचा इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा तटरक्षक दलाने हा नवा अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, आज सकाळी गुजरातमधील कांडलामध्ये कच्छमार्गे पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी घुसखोरी करणार असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली होती. या माहितीनंतर सीमा सुरक्षा दल, भारतीय तटरक्षक दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. पाकिस्तानमधून समुद्रमार्गे येत हे कमांडो किंवा दहशतवादी धार्मिक हिंसाचार निर्माण करण्याचा किंवा दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागल्यानंतर सुमारे ६० एसआरपी जवानांना चेकपॉइंट्सवर तैनात करण्यात आले आहे.