मुंबई वृत्तसंस्था । भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील महत्त्वाची सेवा बंद करण्याचं टोकाचं पाऊल पाकिस्तानने उचलले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पाकिस्तानकडून दोन्ही देशातील टपाल सेवा स्थगित करण्यात आली असून, दोन्ही देशांच्या इतिहासात प्रथमच सेवा बंद झाली आहे.
भारत-पाकिस्तान फाळणी झाली. त्यानंतर दोन्ही देशात तीन वेळा युद्ध झाले. त्यानंतरही दोन्ही देशात कायम तणाव कायम राहिला. पण, दोन्ही देशातील नागरिकांच्या संवादातील महत्त्वाचा दुवा असलेली टपाल सेवा अखंडित सुरू होती. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० रद्द करण्याबरोबर राज्याचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध करत पाकिस्ताननं भारताविरुद्ध कुरापती करण्यास सुरूवात केली. दरम्यान, दोन्ही देशातील नागरिकांच्या संवादाचं माध्यम असलेली टपाल सेवा पाकिस्तानकडून बंद करण्यात आली आहे. २७ ऑगस्टला पाकिस्तानकडून पत्राचं अखेरच पार्सल स्वीकारण्यात आलं असून, भारतासोबतची टपाल सेवा स्थगित करण्यात आल्याचं शेरा मारण्यासाठी भाग पाडलं जात आहे. यासंदर्भात बोलताना टपाल सेवेचे संचालक आर. व्ही. चौधरी म्हणाले, ‘पाकिस्तानकडून एकतर्फी निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारची भूमिका पाकिस्तानने प्रथमच घेतली आहे. पाकिस्तानकडून केव्हा टपाल स्वीकारले जाईल हे सांगता येणार नाही’, असं चौधरी म्हणाले. दरम्यान, दिल्लीतील आंतरराष्ट्रीय कार्यालयाचे अधीक्षक सतीश कुमार म्हणाले की, जवळपास सर्वच टपाल पाकिस्तानला पाठवण्यात आले आहेत. पंजाब आणि जम्मू काश्मीरमधील टपाल जास्त आहे. यात शैक्षणिक आणि साहित्यिक साहित्य आहे, असे ते म्हणाले.