पहूर ता. जामनेर ( रविंद्र लाठे) पहूर हे गाव जळगांव -औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चौफुलीवरील गाव असून पहूर बसस्थानकास खासगी वाहनांनी विळखा घातला आहे. या वाहनांनमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. बसस्थानकावर खासगी वाहनधारक आपली वाहने अस्ताव्यस्त स्वरूपात लावत असल्याने वाहतूकीस अडथळे निर्माण होत आहेत. एस. टी. महामंडळाच्या बसेसना बसस्थानकात जागा नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत.त्यातच खासगी वाहनधारक नियमांची पायमल्ली करताना दिसून येते आहे. वाहतूकीस अडथळे होत असल्याने प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहावे लागते. परिणामी अपघात होवून जिवीत हाणी होण्याची शक्यता आहे.
बसस्थानक की खासगी वाहनतळ ?
राष्ट्रीय महामार्गावरील बसस्थानक असल्याने येथे नेहमीच प्रवाश्यांची मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत खासगी वाहने चक्क बसस्थानकात उभी राहत असल्याने बसस्थानक की खासगी वाहनतळ असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासनाने या कामी जातीने लक्ष देण्याची गरज आहे. पहूर बसस्थानकावर 2011 मध्ये झालेल्या भीषण अपघातात तब्बल अकरा जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. याभीषण अपघातानंतर लोकवर्गणीतून बसस्थानकची निर्मिती करण्यात आली. बसस्थानक परिसरात पुन्हा अतिक्रमणाचा विळखा झाला असून पुन्हा 2011 ची पुनरावृत्ती होते की काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बसस्थानकांची दैन्यावस्था
लोकवर्गणीतून बसस्थानकची निर्मिती करण्यात आल्यानंतर आज रोजी बससस्थानकची दैन्यावस्था झाल्याचे दिसून येत आहे. बसस्थानकात प्रवाशांसाठी खुर्च्या बसविण्यात आल्या होत्या. त्या खुर्च्याही आता दिसत नाहीत. या खुर्च्या गायब झाल्या की चोरीस गेल्या ? असा प्रश्न नागरिकांनकडून उपस्थित केला जात आहे.
मोकाट गुरांमुळे वाहतूक कोंडी
बसस्थानक परिसरात मोकाट गुरांमुळेही वाहतूकीची कोंडी होतांना दिसून येते. बस चालकांना तसेच छोट्या मोठ्या वाहनधारकांना वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पोलीसांनी याबाबत काळजी पुर्वक लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.