बस वाहकाची मुजोरी : पत्रकारांनी असहाय तरूणाला केली मदत

पहूर, ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बसमधून प्रवास करणार्‍या परप्रांतीय मजुराला मुजोर वाहकाने उतरवून दिल्यानंतर त्याला त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचविण्यासाठी पहुर येथील पत्रकारांनी मदत केल्याने त्या तरूणाच्या चेहर्‍यावर हास्य उमटले !

ही गोष्ट आहे असहाय अंकित इंद्रजीत यादव या परप्रांतीय मजुराची ! उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील अंकित इंद्रजीत यादव हा परप्रांतीय मजूर काल मुक्ताईनगर येथून नाशिक जाण्यासाठी बस मध्ये बसला होता. त्याने ४९५ रुपयांचे तिकीट काढून त्याचा प्रवास सुरू झाला. मात्र मुक्ताईनगर ते नाशिक बस पहुर येथे आल्यानंतर त्या बसमधील वाहकाने एका महिलेला जागा देण्याचे सांगून अंकित याला सीट वरून उठवत चक्क बसच्या खाली उतरवून देण्याचा प्रताप केला.
असहाय अंकित पहूर बस स्थानकावर उतरला तर बस पुढे निघून गेली. दरम्यान, बस स्थानकावर असलेले पत्रकार सादिक शेख आणि गणेश पांढरे यांच्या कानी स्थानिक रहिवाशांनी ही घटना घातली . त्यांनी लगेचच त्या तरूणाला बोलते केले. भेदरलेला अंकित फार काही बोलू शकला नाही. त्यात भाषेची अडचण होतीच. मात्र पत्रकार द्वयींनी अधिक चौकशी केली असता त्याने तिकीट दाखवून घडला प्रकार आपल्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला.

ही माहिती मिळताच सादिक शेख व गणेश पांढरे यांनी जामनेर येथील आगार प्रमुख श्री काळे यांना सदर हकीकत सांगितली. त्यांनी पाचोरा येथील आगर प्रमुखांशी संपर्क करून अंकितला पाचोरा येथून पुढील प्रवासासाठी बसविण्याचे सांगितले. मात्र पहूर येथून पाचोरा जाण्यासाठी लगेचच बस उपलब्ध नसल्याने सादिक शेख आणि गणेश पांढरे यांनी नातेवाईकाची दुचाकी घेऊन भर पावसात पाचोरा गाठले . अंकित सोबत होताच . त्याला पाचोरा बस स्थानकावरून नाशिक कडे जाणार्‍या बस मध्ये बसवून निरोप दिला .यावेळी अंकितच्या चेहर्‍यावर हास्य फुलले होते .
पत्रकारांमधील माणुसकीचे दर्शन घडल्याने एका असाहाय परप्रांतीय मजुराला आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाता आले हे मात्र खरे ! तर या प्रकरणात सदर वाहकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Protected Content