Home Cities जळगाव पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांच्याहस्ते विद्यापीठात अत्याधुनिक विश्लेषण व चाचणी सेवा...

पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांच्याहस्ते विद्यापीठात अत्याधुनिक विश्लेषण व चाचणी सेवा कक्षाचे लोकार्पण


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संशोधन, नवोपक्रम आणि औद्योगिक सहकार्याला नवी दिशा देणाऱ्या अत्याधुनिक ‘विश्लेषण व चाचणी सेवा कक्ष’ (ATS) चे मंगळवारी भव्य लोकार्पण झाले. आंतरराष्ट्रीय परिषद ‘ACTAS 2026’ च्या पार्श्वभूमीवर पद्मश्री प्रा. डॉ. जी. डी. यादव आणि कुलगुरू प्रा. व्ही. एल. महेश्वरी यांच्या शुभहस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

विद्यापीठात उभारण्यात आलेला हा अत्याधुनिक कक्ष संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून पदार्थांचे वैशिष्ट्यीकरण, विश्लेषण आणि विविध वैज्ञानिक चाचण्या करण्यासाठी आधुनिक उपकरणांची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संशोधनाची गुणवत्ता वाढण्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगात्मक ज्ञान मिळणार आहे.

स्थानिक तसेच प्रादेशिक उद्योगांसाठीही हा कक्ष उपयुक्त ठरणार आहे. यापुढे उद्योगांना त्यांच्या उत्पादनांच्या चाचण्या आणि तांत्रिक विश्लेषणासाठी बाहेरील मोठ्या प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागणार नाही. विद्यापीठातच तज्ज्ञ मार्गदर्शन आणि आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील दरी कमी होण्यास मदत होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना पद्मश्री प्रा. डॉ. जी. डी. यादव यांनी विकसित भारत २०४७ या संकल्पनेचा उल्लेख करत देशाचा जीडीपी वाढविण्यासाठी संशोधनाधिष्ठित उद्योगांची गरज अधोरेखित केली. रसायन तंत्रज्ञान आणि संलग्न क्षेत्रातील संशोधन देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, ATS कक्ष संशोधकांसाठी एक प्रकारचा प्रकाशस्तंभ ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

ATS कक्षाचे समन्वयक डॉ. भूषण बाळू चौधरी यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, हा कक्ष रासायनिक, अन्न प्रक्रिया तसेच संलग्न अभियांत्रिकी क्षेत्रातील नवोपक्रम, कौशल्य विकास आणि गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी केंद्रबिंदू म्हणून कार्य करेल. विद्यापीठातील संशोधन परिसंस्थेला यामुळे नवे बळ मिळणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आर. डी. कुळकर्णी, प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासह देशभरातून आलेले ४२५ पेक्षा अधिक संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने झालेल्या या उद्घाटनामुळे विद्यापीठाच्या संशोधन क्षमतेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound