अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यात स्वर्गीय उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देणारी सर्वपक्षीय शोकसभा भावनिक वातावरणात पार पडली. पाडळसरे धरणाला स्व. अजित पवार यांचे नाव दिल्यास तीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या मागणीला उपस्थित मान्यवरांनी जोरदार पाठिंबा दिला.
अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या शोकसभेला तालुक्यातील सर्व स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यापारी, शिक्षक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, आशा वर्कर्स, लाडक्या बहिणी, डॉक्टर, लायन्स व रोटरी क्लबचे सदस्य, महिला मंडळ, महसूल संघटना, वकील संघ, पत्रकार संघ, धरण संघर्ष समिती, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक संघ, मंगळग्रह संस्था, अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन तसेच तालुक्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

सभेदरम्यान स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. अनेक वक्त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील आठवणी सांगत जनतेशी असलेले त्यांचे नाते, निर्णयक्षमता आणि जनहितासाठी घेतलेले धाडसी निर्णय यांचा उल्लेख केला. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळताना दिसून आले.



