पाचोरा प्रतिनिधी | तालुक्यातील नगरदेवळा येथील पाच दुकाने फोडून यातील सामान लंपास करणार्या दोघा चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
या संदर्भात माहिती अशी की, तालुक्यातील नगरदेवळा येथे गेल्या महीन्यात स्टेशन रोड व वाणी गल्ली मेन रोड वरील चार ते पाच दुकाने फोडून चोरी करून पसार झालेल्या चोरट्यांना अखेर पकडण्यात यश आले असून पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नगरदेवळा गावातील अस्मिता मटेरियल, अनुज व अनुप कृषी सेवा केंद्र, गणेश ज्वेलर्स, निखिल ज्वेलर्स या दुकानातील सामान, काही रोख रक्कम, डि.व्ही.आर. चोरी करून पसार झाले होते. त्यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस हे. कॉ. विनोद पाटील यांनी जळगांव, धुळे, मुंबई, मालेगांव, येथील गुन्हे अन्वेषण विभागाला याबाबत कळवून सीसीटीव्ही फुटेज व चोरीत वापरण्यात आलेल्या गाडीची माहिती दिली. त्यानंतर धुळे पोलिसांनी त्यांना अटक करून नगरदेवळा पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
राजपालसिंग अजितसिंग भादा (रा. मोहाडी जि.धूळे) व बालुसिंग दिलीपसिंग टाक (रा. घनसावंगी जि. जालना) या अटकेतील संशयित आरोपींची नावे असून नगरदेवळा येथील चोरी केलेला मुद्देमाल हस्थगत करणे, इतर आरिपींचा शोध घेणे, अजून किती ठिकाणी चोरी केली आहे यासर्व बाबींची चौकशी पोलीस कस्टडीत होणार आहे. आजपावेतो चोरीचा तपास लागल्याची ही पहिलीच घटना असून या बाबत नगरदेवळा परिसरातील नागरिकांतर्फे पोलिसांचे कौतूक होत आहे.
ही कार्यवाही पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, सहाय्यक फौजदार कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हे. कॉ. विनोद पाटील, पोलीस नाईक अमोल पाटील, मनोहर पाटील यांनी केली.