पाचोर्‍याच्या पाटील कुटुंबात फूट : स्व. आर.ओ. तात्यांच्या कन्या ‘मातोश्री’सोबत !

पाचोरा-नंदू शेलकर : लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या समावेशासाठी त्यांच्या समर्थकांना आस लागलेली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या चुलत भगिनी तथा दिवंगत माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या सौ. वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याचे जाहीरपणे स्पष्ट केले आहे. पाटील कुटुंबातील हे दोन गट पाचोरा-भडगावच्या राजकारणातील आगामी दिशा स्पष्ट करणारे आहेत का ? हा प्रश्‍न आता विचारला जात आहे.

दिवंगत आमदार स्व. आर. ओ. तात्या पाटील यांनी पाचोरा मतदारसंघात पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकावला. आधी हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. १९७८ ते १९९९ च्या दरम्यान कॉंग्रेसचे के. एम. बापू पाटील आणि जनता पार्टीचे ओंकारआप्पा वाघ यांनी आलटून-पालटून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून अर्थात १९६२ पासून ते १९९९ पर्यंत येथून मराठा समाजाचाच आमदार निवडून जात होता. १९९९ मध्ये मात्र आर. ओ. तात्या पाटील यांच्या रूपाने राजपूत समाजातील नेत्याने या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले. तेव्हा त्यांनी ओंकारआप्पा वाघ तर नंतरच्या म्हणजे २००४ सालच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र दिलीप वाघ यांना पराभूत केले. २००९ साली मात्र दिलीप वाघ यांनी तात्यांना पराभूत केले. हे सारे होत असतांना तात्याचे पुतणे किशोरआप्पा पाटील हे पोलिसातील नोकरी सोडून स्थानिक राजकारणात सक्रीय झाले. आधी नगरपालिकेत काम केल्यानंतर त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप वाघ यांना पराभूत करून विधानसभा गाठली. २०१९ मध्ये ते पुन्हा निवडून आले. अर्थात, तात्यांचे राजकीय वारसदार म्हणून किशोरआप्पा पाटील असल्याचे आता सर्वश्रुत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तांतराच्या खेळात किशोरआप्पा पाटील हे अगदी पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते. खरं तर त्यांचे आणि शिंदे यांच्यातील निकटचे संबंध हे कुणापासून लपून राहिलेले नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांना आगामी मंत्रीमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपद देखील अपेक्षित आहे. किंबहुना आप्पांच्या समर्थकांना याची आस लागलेली आहे.

एकीकडे सर्वांना किशोरआप्पांच्या मंत्रीपदाची आस लागलेली असतांनाच, आज स्व. आर.ओ. तात्या पाटील यांच्या कन्या सौ. वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी उध्दव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्यातील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये या जाहिराती झळकल्या आहेत. तात्यांनी आयुष्यभर विचारांशी तडजोड न करता ते एकनिष्ठ राहिले असून आपण देखील हाच वारसा चालविणार असल्याचे या जाहिरातीत ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच या जाहिरातीत शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. याचा सरळस्पष्ट अर्थ हा सौ. वैशाली सूर्यवंशी या उध्दव ठाकरे यांच्या गटासोबत आहेत.

सौ. वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी उध्दव ठाकरे या फार व्यापक विस्तार असणार्‍या निर्मल सीडस या कंपनीच्या संचालिका असून निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी आजवर कधीही राजकीय इच्छा-आकांक्षा व्यक्त केलेली नाही. स्व. आर. ओ. तात्यांचा राजकीय वारसा हे त्यांचे पुतणे किशोरआप्पा पाटील तर उद्योजकीय आणि शैक्षणीक वारसा हा कन्या सौ. वैशाली सूर्यवंशी चालवणार असल्याचे आधीच दिसून आले होते. मात्र अचानकपणे त्यांनी उध्दव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याने राजकीय अभ्यासकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या आहेत.

सौ. वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी कधीही राजकीय आकांक्षा व्यक्त केली नव्हती. पडद्यामागे राहून निर्मल सीडस आणि स्कूला यांना प्रगतीपथावर नेण्याचे काम त्यांनी केले आहे. मात्र अचानकपणे आणि राज्यातील राजकीय कोलाहलाच्या पर्वात त्यांनी थेट स्पष्ट भूमिका घेत आपण उध्दव ठाकरे यांच्या सोबत असल्याचा दिलेला संदेश हा लक्षणीय मानला जात आहे. त्यांच्या या निर्णयातील जर-तरच्या शक्यता देखील आता तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत किशोरआप्पा पाटील हे शिंदे गटातर्फे रिंगणात राहतील हे स्पष्ट आहे. त्यांच्या विरूध्द सौ. वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी या राहतील का ? याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. असे झाल्यास घरातील ही राजकीय लढाई राज्यात चर्चेचा विषय बनले. किशोरआप्पा पाटील हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निसटत्या मतांनी निवडून आले आहेत. समोर त्यांच्याच चुलत भगिनी असतील तर मुकाबला रोचक होईलच, पण याचा रिंगणातील उर्वरित प्रतिस्पर्धी त्यातही प्रबळ आव्हाने उभे करणारे अमोल शिंदे व दुसरे विरोधक दिलीप वाघ यांना काय लाभ-हानी होईल ? याचे गणीत देखील बदलणार आहे. सौ. वैशालीताई या स्वत: उभ्या न राहता त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या पाठीशी आपली शक्ती उभी केल्यास याचा परिणाम देखील होऊ शकतो. अगदी असेही नाही झाले तरी पाटील कुटुंबात आता राजकीय विचारांची फूट पडल्याचा संदेश मतदारांपर्यंत गेला असून याचा देखील पाचोर्‍याच्या राजकीय वाटचालीवर परिणाम होण्याची शक्यता आहेच.

जाता-जाता दोन महत्वाचे मुद्दे : दिवंगत तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या निर्मल सीडस कंपनीच्या परिसरात पुतळा उभारणीचे काम पूर्ण झाले असून याच्या अनावरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावे अशी गळ किशोरआप्पा पाटील यांनी घातली होती. ठाकरे यांनी त्यांना पाचोर्‍यात येण्याचा शब्द देखील दिला होता. आता वैशालीताईंनी त्यांच्या सोबतच राहण्याचे जाहीर केल्याने उध्दव ठाकरे हे पुतळा अनावरणासाठी पाचोर्‍यात येऊ शकतात.

दुसरा मुद्दा असा की, जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला आजवर विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले असले तरी खासदार कधी झाला नसल्याची खंत नेतृत्वाला होती. यामुळे २०१४ साली तात्यांना पक्षाने खासदारकीची तयारी करायला सांगितली होती. मात्र तेव्हा युती झाली. तर २०१९ मध्ये देखील तयारीला लागल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तेव्हाही युती झाली आणि महत्वाचे म्हणजे तात्यासाहेब आजाराने ग्रासलेले होते. परिणामी त्यांचे खासदारकीचे स्वप्न अपूर्ण राहिले. या पार्श्‍वभूमिवर, वैशालीताईंच्या माध्यमातून या स्वप्नाची पूूर्तता करता येईल असे किशोरआप्पा पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगितल्याची माहिती समोर आली होती. याचा विचार करता, थेट आपले बंधू किशोरआप्पा पाटील यांच्या समोर उभे ठाकण्याऐवजी त्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे रिंगणात उतरण्याची शक्यता देखील आहेच.

या सर्व बाबींपैकी नेमके काय होणार ? याचे उत्तर तर काळ देणार आहे. मात्र दिवंगत आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी थेट घेतलेली राजकीय भूमिका आणि मातोश्रीसोबत राहण्याचा केलेला निर्धार पाचोरा-भडगाव मतदारसंघासह जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान समीकरणे बदलणारा ठरू शकतो हे कुणाला नाकारता येणार नाही.

Protected Content