पाचोरा प्रतिनिधी | अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करणार्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की, लासगाव ता. पाचोरा येथील महेंद्र सोनवणे या (वय – २१) वर्षीय युवकाने आपल्या घरासमोर राहणार्या १७ वर्षीय अल्पवयीन युवतीशी सतत संपर्क साधत, प्रेमाचा बहाणा करत, तिला विश्वासात घेतले. तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो मोबाईल मध्ये काढून त्याआधारे तिला धमकावत गेल्या महिनाभरापासून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने कोणाला सांगितले तर तुझ्या
वडिलांना जिवे ठार मारीन अशी धमकीही या युवकाने दिल्याने सदरची पीडित युवती प्रचंड घाबरली.
या युवकाचा अन्याय व वासना दिवसागणिक वाढत असल्याने पीडित युवतीने हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला व पाचोरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी महेंद्र सोनवणे या युवका विरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पीडित युवतीसह युवकाची पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.