पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सार्वे बुद्रुक येथील आदिवासी आश्रमशाळेतील जनरेटरच्या चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून यातील मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.
सार्वे बु येथील आदिवासी शासकीय आश्रम शाळेतील जनरेटर दि. ३ नोव्हेंबर रोजी चोरीस गेले होते. त्या प्रकरणी दि. १० रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व तपासचक्रे फिरवत शाळेतील कर्मचारी रोहित गोविंद भालेराव व पिंप्री येथील अशोक हिलाल अहिरे यांना चौकशीसाठी बोलविले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघेही पोपटासारखे बोलू लागले व हे चोरी करायला लावलेल्या मुख्य आरोपीचे नाव पोलिसांना सांगितले.
दरम्यान, दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ड्युटीवर असलेल्या कर्मचार्याला जीवे मारण्याची व कामावरून काढण्याची धमकी देऊन सदरचे कृत्य करण्यास आम्हाला भाग पाडले असून एम. एच. ४३ व्ही. ४३५७ या क्रमांकाच्या मारुती व्हॅन मध्ये सदरचे जनरेटर ठेवून भडगाव येथे ते विक्री केल्याचेही त्या संशयितांनी सांगितले.
या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन चौकशी होताच खाजोला रस्त्यावर शाळेजवळ दि. १२ रोजी रात्री कोणीतरी एक जनरेटर सोडून गेल्याचे ग्रामस्थांकडून सकाळी पोलिसांना सांगण्यात आले. तेव्हा पोलिसांनी तेथे धाव घेत जनरेटर जमा केले आहे. परंतु ते जनरेटर कोणी आणलं? कोणाच्या सांगण्यावरून आणले? शाळेतील चोरी गेलेले जनरेटर तेच आहे की दुसरं आहे याचाही शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी सार्वे ग्रामस्थांनी केली आहे.
या आधीही शाळेतून दोन संगणक, पाण्याच्या टाक्या, भंगार अश्या अनेक वस्तू चोरी गेल्या आहेत. तरी या प्रकरणात जो कोणी सूत्रधार चोरटा असेल त्याचा पोलिसांनी कसून शोध घेऊन कोणत्याही राजकीय व आर्थिक दबावाला बळी न पडता कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.