पाचोरा प्रतिनिधी । स्वच्छ सर्वेक्षण – २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत शासनाने दिलेल्या सुचनांनूसार पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी पाचोरा नगरपालिकेच्या वतीने “पर्यावरण स्नेही बाप्पा” या पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानाअंतर्गत शहरात कृत्रिम तलाव तयार करण्यात आला असून या तलावांमध्ये घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जन करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. पाचोरा न. पा. क्षेत्रापासून जवळच असलेल्या बहुळा तलावात दरवर्षी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. यामध्ये मुख्यतः पी. ओ. पी. मृतींचा समावेश असतो. पी. ओ. पी. च्या मुर्त्या विसर्जित केल्याने पाण्यामध्ये केमिकल जाऊन सदरच्या तलावातील पाणी दूषित होते. त्याकारणाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ही बाब लक्षात ठेवून पाचोरा नगरपालिकेकडून शहरात तसेच विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौकात, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, आठवडे बाजार, जारगांव चौफुली, जळगांव चौफुली, बहुळा धरण या ठिकाणी कृत्रिम तलावाची, कुंडाची तसेच श्री. गणेश मुर्ती व निर्माल्य संकलन केंद्रांची देखील व्यवस्था करण्यात आली आहेत.
नागरिकांनी पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्याकरीता जवळच्या परिसरातील कृत्रिम तलावात, कुंडात गणेश मूर्तीचे विसर्जन तसेच निर्माल्य जमा करावे. नगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या श्री. गणेश मुर्ती संकलन केंद्रावर, बहुळा धरण परिसरात तसेच कृत्रिम तलाव परिसरात नागरिकांनी नाहक गर्दी करून कोरोना नियमांचे उल्लंघन करू नये. असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचेकडून करण्यात आले आहे.