Pachora पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा ते जामनेर अर्थात पी.जे. रेल्वेचे रूंदीकरण होणार असून यासाठी ७५५ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असल्याची माहिती खासदार उन्मेषदादा पाटील यांनी दिली आहे.
कोविडच्या कालखंडात बंद झालेल्या बहुतांश रेल्वे प्रवासी गाड्या सुरू झाल्या असल्या तरी मात्र पाचोरा ते जामनेर म्हणजेच पी. जे. रेल्वे सुरू झाली नसल्याने यावर अवलंबून असणार्या नागरिकांमध्ये रोष व संशयकल्लोळ आहे. या पार्श्वभूमिवर खासदार उन्मेषदादा पाटील यांनी पाचोरा रेल्वे फलाटावर पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला अ पीजे रेल्वे बचाव कृती समिती अध्यक्ष खलिल देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, ऍड.अविनाश भालेराव, भरत खंडेलवाल, मनीष बाविस्कर, विकास वाघ, सदाशिव पाटील, ऍड.आण्णासाहेब भोईटे, प्रताप पाटील, मंगेश पाटील, रणजित पाटील, व्ही.टी.जोशी, कांतीलाल जैन, संजय जडे, धनराज पाटील, दीपक पाटील, दीपक माने, राजू पाटील, अनिल येवले, पप्पू राजपूत, अशोक कदम, पुंडलिक पाटील, गणेश पाटील, नंदू सोनार, शहाबाज बागवान, सोमनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार पाटील म्हणाले की, कोविड काळात देशात सुमारे ९०० प्रवाशी रेल्वेगाडया बंद झाल्या. त्यापैकी काही गाड्या नंतर सुरु झाल्या. मात्र उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने पीजे नॅरोगज रेल्वमार्ग बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. मात्र यामुळे नागरिकांची गैरसोय होत असू पीजे बचाव कृती समितीने उभारलेल्या जनआंदोलनात वस्तुस्थिती जाणून घेत दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला. याचेच फलीत म्हणून पाचोरा-जामनेर रेल्वे मार्गाचे रूंदीकरण अर्थात नॅरो गेजमधून याला ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्यासाठी ७५५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार पाटील यांनी दिली.
दरम्यान, यासाठी आपल्यासोबत खासदार रक्षाताई खडसे यांनी देखील पाठपुरावा केल्याचे खासदार पाटील यांनी नमूद केले. प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेत पाचोरा ते बोदवड ब्रॉडगेज महामार्गाचा डी.पी.आर. तयार करून त्याला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. या योजनेतून सिव्हिल इंजिनिअरिंग विभागासाठी ७१३.३९ कोटी, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग विभागासाठी १३४ कोटी, सिग्नल ऍण्ड टेलिकॉम विभागासाठी १०२.८९ कोटी व मॅकनिकल इंजिनिअरिंगसाठी ५.११ कोटी असा एकूण ९५५.३९ कोटी रूपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती खासदार उन्मेषदादा पाटील यांनी दिली.