पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळाला मोठा धक्का देणारी घटना मंगळवारी घडली असून उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून पाचोरा शहरातही तीव्र शोकभावना व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवार, २८ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ८:३० वाजता झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले. ही घटना समजताच राज्यभरातून शोकसंदेशांचा वर्षाव सुरू झाला. त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यशैली, राजकीय अनुभव आणि प्रशासनावरील पकड यामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय होते.

स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने पाचोरा शहरातील सर्व राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण पाचोरा शहर शांततेत बंद ठेवण्यात येणार आहे. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त निवेदन पाचोरा पोलिस प्रशासनाकडे सादर केले आहे. सदर निवेदन पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांनी स्वीकारले. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
निवेदन सादर करताना मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन तावडे, विकास पाटील, अजहर खान, प्रविण पाटील, मराठा सेवा संघाचे जिभाऊ पाटील, राहुल बोरसे, अनिल सावंत यांच्यासह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.



