धरणगाव, प्रतिनिधी । शतकमहोत्सवी पी. आर. हायस्कूलचे विद्यार्थी कोरोना संसर्ग काळात घरी बसून आॅनलाईन शिक्षण घेत असून यात ग्रामीण भागातील विद्यार्थीही उत्साहाने सहभागी झालेले आहेत.
कोरोनाने जगाच्या शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल घडवला आहे. अध्यापनाचीही पद्धत बदलून आॅनलाईन शिक्षण पद्धती अंगिकारली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणविभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आपले विद्यार्थी अभ्यासात मागे राहू नये म्हणून पी. आर. हायस्कूलने एप्रिल महिन्यापासूनच दहावीच्या आणि इतर वर्गांतील विद्यार्थ्यांना जून महिन्यापासून आॅनलाईन अभ्यास सुरू केला आहे. या शाळेतील शिक्षक आॅनलाईन तंत्रज्ञानाने शासनाच्या दिशा, गुगल क्लासरुम, झुम मिटींग, व्हाॅट्स अप इत्यादी अॅप्स सोबत स्वतःचे व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहेत. त्याचप्रमाणे टेस्टमोजच्या साहाय्याने टेस्ट तयार करून विद्यार्थी त्या घरच्या घरी सोडवत आहेत. शिक्षक त्या अॅप्सच्या मदतीने तपासून देत आहेत. आपले अध्यापन अधिकाधिक रंजक होण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत असून विद्यार्थीही त्यांना प्रतिसाद देत आहेत.ज्या विद्यार्थ्यांकडे अॅडराईड मोबाईल नाहीत, त्यांचा ज्यांच्याकडे मोबाईल आहेत अशांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतले आहे. दरम्यान पी.आर.हायस्कूलमध्ये अॅडमिशन प्रक्रिया सुरू असून ज्यांना आॅनलाईन अॅडमिशन घेता येत नाही त्यांनी डायरेक्ट शाळेत सकाळी नऊ ते बारा या दरम्यान अॅडमिशन मिळत आहे. अॅडमिशनबद्दल कुठल्याही शंका असल्यास सरळ संवाद साधावा, असे आवाहन उपमुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले आहे.