भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील ओझरखेडा येथील साठवण तलावाला गळती लागली असून यामुळे तिवरे धरण फुटल्यासारखी दुर्घटना होण्याची भिती असून याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील ओझरखेडा येथे साठवण तलाव असून यात तापी नदीतून वाया जाणारे पाणी उपसा सिंचनाच्या माध्यमातून साठवले जाते. यातून दीपनगर येथील प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र याआधीच या तलावाला गळती लागली असून यातील पाणी वाहून जात आहे. या गळतीकडे संबंधीत खात्याच्या अधिकार्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जोरदार पाऊस झाल्यास हा बंधारा फुटून कोकणातील तिवरे धरणासारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असूनही तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे.
या संदर्भात भुसावळ विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, ही गळती मुख्य तलावाला लागलेली नसून ओझरखेडा ते दीपनगर या जलवाहिनीच्या सुरवातील पाईपलाईन व काँक्रीटच्या मधून गळती होत असल्याचा दावा त्यांनी केला. धरण हे पूर्णपणे सुरक्षित असून गळती थांबविण्याचे काम येत्या आठ दिवसांमध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर या संदर्भात आमदार संजय सावकारे म्हणाले की, ही गळती मुख्य धरणातून होत नसल्यामुळे कोणताही धोका संभवत नाही. तथापि, गळती थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
पहा : ओझरखेडा येथील तलावातील गळतीबाबतचा हा व्हिडीओ वृत्तांत.