हैदराबाद वृत्तसंस्था । लिंचिंग हा शब्द भारतातला नाही, मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होत नाही, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरातील रेशीमबाग येथे आयोजित संघाच्या विजयादशमी उत्सवात केले होते. त्यावर एमआयएम पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी टोला लगावला आहे.
मॉब लिंचिंगबाबत केलेल्या वक्तव्यावरून एमआयएम पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या विचारधारेनं गांधी आणि तबरेज यांची हत्या केली, त्याहून अधिक भारताची बदनामी होऊच शकत नाही, असे ओवेसी म्हणाले. तर ज्या दिवशी भागवत एकजुटीच्या संदेशाचं पालन करतील त्या दिवशी मॉब लिंचिंग आणि द्वेष यांसारख्या समस्या दूर होतील, असा टोला दिग्विजय सिंह यांनी लगावला. जमावाकडून झालेल्या हत्यांमधील पीडित भारतीय आहे. मॉब लिंचिंगमधील दोषींना कुणी माळा घातल्या होत्या? आपल्याकडे भाजप खासदार गोडसे समर्थक आहेत, असे ओवेसी म्हणाले. मॉब लिंचिंगसारख्या घटना रोखण्याबाबत भागवत काहीच सांगत नाहीत, असेही ते म्हणाले.