चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एका नराधम तरुणाने पाच वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घृणास्पद कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, संतप्त नागरिकांनी आरोपी तरुणाला बेदम चोप देत चोपडा पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळी वाहतूक करून आपला उदरनिर्वाह करणारा एक तरुण चोपडा तालुक्यातील परिसरात राहतो. या नराधमाने परिसरातील एका पाच वर्षांच्या लहान मुलीला आपल्या घरी बोलावले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी तरुणाला पकडले आणि त्याला बेदम चोप दिला.

जमावाच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आरोपी तरुणावर सध्या चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, अत्याचाराच्या प्रयत्नात भयभीत झालेल्या मुलीवरही उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नराधम तरुणाविरोधात चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासात आरोपीने दारूच्या नशेत हे घृणास्पद कृत्य केले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


