मुंबई (प्रतिनिधी) पवारांची टीम संपलेली असून आता राज्यात आमचीच टीम काम करणार आहे. आम्ही राजकारणी नाही, समाजसेवक आहोत, म्हणून इथपर्यंत पोहोचलो आहोत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आज पंढरपूर येथील सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. अजित पवारांनी धरणातील पाण्याबद्दल केलेल्या वाक्याचीही त्यांनी आठवण करून दिली.
मुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी, रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. यावेळी कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यातील समाजकारणात असलेली सर्व माणसे आम्ही जोडली आहेत. दबावतंत्रावर खूप वर्षे तुम्ही राज्य चालवले, पण रावणराज जास्त काळ चालत नाही, रामराज्य येतच असते. कल्याणराव तुमच्यावर कुणी दबाव टाकला तर मला सांगा, रातोरात मी काय करायचं ते बघतो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशाराच दिला आहे.
या जिल्ह्यातील माणसं ही स्वत:चा नाही तर समाजाचा स्वार्थ घेऊन भाजपात येत आहेत. आम्ही सत्तेत आलो, तेव्हा लोकांनी आमच्यावर प्रश्न उभे केले. सहकार, साखर कारखाने अन् शेतीतलं यांना काय कळतं, असं आम्हाला हिणवलं. मात्र, साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याच काम आम्ही केलं. राहुल गांधींवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केलं. ओपनींग बॅटसमन म्हणून कॅप्टन मैदानात उतरले आणि नंतर पळून गेले, असे म्हणत पवारांनी माढ्यातून घेतलेल्या माघारीची खिल्ली उडवली.